- महासभेतील त्या नगरसेवकांचे ते वक्तव्य अतिरंजित असल्याचा पोलिसांचा अप्रत्यक्ष आरोप..
- काळेवाडी पोलीसांचा खुलासा..
- नेमकी खरी बाजू कोणाची? नागरिक संभ्रमात…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- काळेवाडी परिसरातील तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणावरून पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले असून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली.
त्यानंतर आता काळेवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने अधिकृत पत्रक प्रसिद्धीस देत संबंधित आरोप फेटाळण्यात आले असून काही लोकप्रतिनिधींनी पोलीस दल आणि गृह विभागाची विनाकारण बदनामी केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.
मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत काळेवाडीतील काही नगरसेवकांसह बहुतांश सदस्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला होता. संबंधित प्रकरणात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना “साक्षीदार आणा” असे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधींनाच दाद देत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल सभेत उपस्थित करण्यात आला होता.
सभागृहात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासोबत विशेष बैठक घेण्याची मागणीही नगरसेवकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वतीने अधिकृत प्रसिध्दीपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
काय म्हटलंय पत्रकात?…
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी वायसीएम रुग्णालयातून एमएलसी क्रमांक २७८१/२०२६ प्राप्त झाला होता. त्यानुसार एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळताच काळेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि महिला कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. पीडित मुलगी आणि तिच्या आईची चौकशी केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने आंबा देण्याचे आमिष दाखवून मुलीला खोलीत नेऊन अत्याचार केल्याचे समोर आले.
यानंतर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(१), ६५(२) तसेच पॉक्सो कायद्यान्वये दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३१ वाजता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच गुन्हे शोध पथकाला आरोपीच्या शोधासाठी आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी कसोशीने तपास करत आरोपी विजय पोपट भोसले (वय ४७, रा. दिघेचाळ, नढेनगर, काळेवाडी) याला त्याच दिवशी भोसरी उड्डाण पुलाखालून ताब्यात घेत अटक केली. दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०२ वाजता आरोपीला अटक करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक झाल्यानंतर तीन दिवसांनी एका लोकप्रतिनिधीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र, दि. ५ मे रोजी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी “साक्षीदार आणा” अशी मागणी केल्याचा आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. हे सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लोकप्रतिनिधींचा प्रसिद्धीसाठी खटाटोप?…
काही लोकप्रतिनिधींनी स्वतःची प्रसिद्धी मिळविण्यासाठी तसेच पोलीस दल आणि गृह विभागाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा ठपकाही काळेवाडी पोलिसांनी या पत्रकात ठेवला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.













