- फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- देशात जनगणना आणि जातीनिहाय जनगणनेबाबत चर्चा सुरू असतानाच, याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवीन जाळे विणले आहे. सोशल मीडियावर सध्या बनावट फॉर्म आणि लिंक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, याद्वारे नागरिकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरली जात असल्याचे समोर आले आहे.
सायबर गुन्हेगार स्वतःला सरकारी अधिकारी किंवा एजंट असल्याचे भासवतात. “जातीनिहाय जनगणना सुरू आहे, तुमची माहिती अपडेट करा” किंवा “सरकारी योजनांचा लाभ हवा असल्यास नोंदणी करा” असे आमिष दाखवून नागरिकांना फोन, WhatsApp किंवा SMS द्वारे संपर्क साधला जातो. त्यानंतर एक बनावट लिंक पाठवून त्यावर आधार क्रमांक, बँक तपशील आणि OTP मागवून खात्यातील पैसे लंपास केले जातात.
या बनावट लिंकपासून सावध राहा.
सोशल मीडियावर “Caste Census”, “castecensusindia” किंवा “जनगणना माहिती फॉर्म” या नावाच्या लिंकपासून दूर राहा.
अनेकदा या लिंक .com, .in, .org किंवा चक्क ‘Google Form’ च्या स्वरूपात असतात.
लक्षात ठेवा: अधिकृत सरकारी कामासाठी फक्त gov.in या डोमेनचाच वापर केला जातो.
कोणती माहिती शेअर करू नये?
नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर किंवा व्यक्तीला खालील माहिती देऊ नये:
१. ओळखपत्र: आधार क्रमांक, पॅन कार्ड, मतदान कार्ड.
२. बँक तपशील: बँक खाते नंबर, UPI पिन, ATM कार्ड माहिती.
३. संवेदनशील डेटा: मोबाईल नंबर, OTP आणि मालमत्तेची कागदपत्रे.
संरक्षणासाठी काय करावे?
* अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
* सरकारी अधिकारी कधीही फोनवर OTP किंवा आर्थिक माहिती मागत नाहीत, हे लक्षात ठेवा.
* कोणताही सर्वे संशयास्पद वाटल्यास अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन शहानिशा करा.
* संशयास्पद कॉल किंवा मेसेज त्वरित ब्लॉक करा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमची किंवा ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली असेल, तर वेळ न घालवता त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा. तसेच, www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.













