न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरू केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत असून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ बिलांचे वाटप झाले आहे.
शहरातील ७ लाख ६६ हजार ३८५ मालमत्तांपैकी १ लाख ५३ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी कर भरला असून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदारांना बिलासोबत जप्तीपूर्व नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून २४ हजार ६२६ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. महापौर रवि लांडगे आणि उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांना वेळेत कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.















