न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टी परिसरातील विनापरवाना उभारण्यात आलेल्या झोपडीवर निष्कासन कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईसाठी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण पथक, २० एमएसएफ जवान, ४० मजूर तसेच ब्रेकर आणि गॅस कटर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
घटनास्थळी पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी भेट देऊन कारवाईची पाहणी केली. पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
महापालिकेच्या जागेवर किंवा झोपडपट्टी क्षेत्रात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास कायद्यानुसार निष्कासनाची कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून अनधिकृत बांधकाम टाळावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.














