- मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराबाबत जनजागृती व रुग्णांना मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिव्यांग भवन फाऊंडेशन आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिनानिमित्त दिव्यांग भवन येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त ममता शिंदे आणि सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमात न्युरोलॉजिस्ट डॉ. परेश बाबेल यांनी मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) या मेंदू व मज्जारज्जूशी संबंधित दीर्घकालीन आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. योग्य निदान व उपचारांमुळे रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
दिव्यांग भवनच्या सुविधांची माहिती पूजा भापकर यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात ‘अनुभव क्षेत्र’ उभारून नागरिकांना एमएसग्रस्तांच्या दैनंदिन अडचणींचा अनुभव देण्यात आला. यावेळी एगलन्स मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सचिन तुरुकमारे यांना इलेक्ट्रिक बाईक भेट देण्यात आली. विविध मान्यवर, दिव्यांग व्यक्ती, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















