- राष्ट्रवादीच्या मारूती जाधवांची महावितरणकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडलगत असलेल्या भीमशक्तीनगर परिसरात विद्युत तारा धोकादायकरित्या खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी महावितरणच्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, भीमशक्तीनगर परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात अनेक ठिकाणी विद्युत तारा अत्यंत खाली आल्या असून त्या नागरिकांच्या घरांजवळ तसेच रस्त्यालगत धोकादायक स्थितीत आहेत. या भागात सुमारे १० हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ही समस्या मागील काही वर्षांपासून कायम असून संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई झालेली नाही. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वारे किंवा मुसळधार पावसामुळे या तारा तुटण्याची शक्यता वाढली असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मारुती जाधव यांनी महावितरण प्रशासनाने तात्काळ पाहणी करून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंचावाव्यात, आवश्यक दुरुस्ती करावी तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाची महावितरणने तातडीने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, असं तक्रारीत म्हटले आहे.















