न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७ जून २०२६) :- उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला NCMC (National Common Mobility Card) वितरण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. नागरिकांना आधुनिक, डिजिटल आणि सुलभ वाहतूक सुविधांशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारत सरकारच्या “वन नेशन, वन कार्ड” या महत्त्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले NCMC कार्ड नागरिकांना मेट्रो, बस, सार्वजनिक वाहतूक सेवा, पार्किंग, टोल तसेच विविध डिजिटल व्यवहारांसाठी एकाच कार्डाचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होऊन अधिक सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करणे शक्य होते.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ९५६ NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले असून डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत डिजिटल इंडिया, कॅशलेस व्यवहार, स्मार्ट सिटी, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित नागरिक सेवा यांना मोठी गती मिळाली आहे. सामान्य नागरिकांपर्यंत या योजनांचा आणि सुविधांचा लाभ पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. NCMC कार्ड ही केवळ प्रवासाची सुविधा नसून डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारे प्रभावी माध्यम आहे. पिंपळे सौदागर परिसरातील प्रत्येक नागरिकाला या सुविधेचा लाभ मिळावा, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सुलभ व्हाव्यात आणि डिजिटल व्यवहारांचा स्वीकार वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाची पावती असून भविष्यातही उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अशाच लोकहिताच्या आणि विकासाभिमुख उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”*
ह.भ.प. विजय पांडुरंग जगताप यांनीही उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी बारा वर्षांच्या कारकिर्दीत देशाने डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय अनुभवला आहे. UPI, डिजिटल पेमेंट, स्मार्ट कार्ड प्रणाली आणि नागरिककेंद्रित सेवांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. NCMC कार्ड ही त्याच परिवर्तनशील विचारधारेची पुढची पायरी आहे. उन्नती सोशल फाउंडेशन आणि नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करून राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शासनाच्या डिजिटल उपक्रमांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
या प्रसंगी ह.भ.प. तथा गोसेवक विजय पांडुरंग जगताप, जयनाथ काटे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, कैलास कुंजीर, शारदा मुंडे, गायिका भारती ज्ञायाधीश, रश्मी मोरे, आनंद हास्य क्लबचे सर्व सदस्य, विठाई वाचनालयाचे पदाधिकारी, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, ऑल सीनियर सिटिझन ग्रुपचे प्रतिनिधी तसेच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेमलाल लांजेवार यांनी केले, तर उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.














