न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या काही अधिकारी व पर्यवेक्षकांच्या संगनमताने भंगार साहित्याची विल्हेवाट लावली जात असून त्यामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कचरा संकलन केंद्रांमध्ये जमा होणाऱ्या भंगार साहित्याची अधिकृत नोंद, लिलाव प्रक्रिया आणि त्यातून मिळणारी रक्कम जमा करण्याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेची पूर्वपरवानगी, ठराव किंवा अधिकृत मंजुरी नसताना कचरा संकलन केंद्रातील भंगार साहित्य बाहेर काढण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने हा कारभार तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
दरमहा लाखो रुपयांच्या भंगार साहित्याचा व्यवहार होत असल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे या व्यवहारातून नेमका किती महसूल मिळाला आणि तो कुठे जमा झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.















