न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ जून २०२६ :- चिखलीतील कुदळवाडी परिसरातील डायमंड चौक येथे असलेल्या भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (दि. २३) पहाटे भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरत होती. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अनेक तासांच्या अथक मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
गोदामातील काही ठिकाणी धुमस सुरू असल्याने आग पूर्णपणे विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीत भंगार साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.














