न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | २३ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटरची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती, शैक्षणिक नोंदी, शासकीय योजनांची माहिती, विविध ऑनलाइन पोर्टलवरील माहिती भरणे, उपस्थिती नोंद, परीक्षा माहिती तसेच अन्य प्रशासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर संगणकीय पद्धतीने केले जाते. मात्र अनेक शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटर उपलब्ध नसल्याने ही जबाबदारी शिक्षकांवर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे शिक्षकांचा अध्यापनासाठी उपलब्ध वेळ कमी होत असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटर नेमावेत, विद्यार्थी संख्या व कामाचा भार लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, ऑनलाइन कामकाजासाठी आवश्यक सुविधा वाढवाव्यात आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डिजिटल व ई-लर्निंगशी संबंधित कामे अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि शाळांचे प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.















