न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जून २०२६) :- चिंचवड येथील साऊथ इंडियन बँक शाखेत बनावट सोन्याच्या आधारे गोल्ड लोन मिळवून एका नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मोरे (वय २५, रा. काळेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते रुपीक कॅपिटल प्रा. लि. या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या वतीने चिंचवड येथील साऊथ इंडियन बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दि. २५ मार्च २०२६ रोजी वैभव ध्यानकुमार कांबळे (वय २६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) हा फिर्यादींना भेटला. त्याने आयआयएफएल कंपनीकडून गोल्ड लोन घेतल्याचे दाखवत त्याच सोन्यावर अधिक कर्ज मिळू शकते का, याबाबत चौकशी केली. त्यानंतर आरोपीची कागदपत्रे तपासून रुपीक कंपनीने पाच तोळे सोन्याच्या बदल्यात ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते, असे कळविले.
मात्र आधीचे कर्ज टेकओव्हर होत नसल्याने रुपीक कंपनीने आरोपीच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ३ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपीने ही रक्कम पूर्वीच्या कंपनीकडे भरून सोन्याची बांगडी (कडे) सोडवून घेतली आणि ती साऊथ इंडियन बँक शाखेत आणली.
बँकेत सोन्याची तपासणी करण्यात आली असता संबंधित बांगडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर फिर्यादींनी आरोपीकडे खरे सोने तारण ठेवण्याची किंवा कंपनीची रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र आरोपीने त्यास नकार देत बनावट सोने तेथेच ठेवून पलायन केले. तसेच आजपर्यंत कंपनीची रक्कमही परत केलेली नाही. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पांडे करीत आहेत.















