- परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; गाड्यांच्या टपावरील पार्सल वाहतुकीला चाप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जून २०२६) :- खाजगी प्रवासी व लक्झरी बसेसमधून होणाऱ्या अवैध कुरिअर पार्सल वाहतुकीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनांचे परमिट थेट रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी ७ ते १० दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० ते १५ दिवस आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी १५ ते ३० दिवस परमिट निलंबित केले जाईल. चौथ्या गुन्ह्यात संबंधित वाहनाचे परमिट कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.
अवैध मालवाहतुकीमुळे बसच्या यांत्रिक यंत्रणांवर ताण येऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दा आमदार जगताप यांनी सभागृहात मांडला. या निर्णयामुळे अवैध पार्सल वाहतुकीला आळा बसेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.















