- पिंपरीतील कपडा बाजारातील दुकानात चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६) :- पिंपरीतील कपडा बाजार परिसरातील दुकानात काम करणाऱ्या सेल्समनने डुप्लिकेट चावीचा वापर करून दुकानाचे शटर उघडून तब्बल २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कपडा बाजारातील बी-१९/०५ येथील ‘प्रगती ड्रेसेस एन एक्स’ या दुकानात घडली. फिर्यादी आकाश राजेश जवराणे (वय ३३) हे कपड्यांचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या आरोपीने त्याच्याकडील डुप्लिकेट चावीने दुकानाचे कुलूप उघडले. त्यानंतर शटर उघडून दुकानात प्रवेश करत २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी रात्री १०.५० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे व सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे करीत आहेत.


















