- २४ तासांत कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६) :- प्रभाग क्रमांक १ मधील चिखली येथील म्हेत्रेवस्ती परिसरात ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य यश दत्तात्रय साने यांनी या घटनेबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पशुवैद्यकीय विभागाच्या उपायुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभागनिहाय विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असतानाही चिखली परिसरात प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप साने यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
म्हेत्रेवस्ती आणि संपूर्ण चिखली परिसरातील हिंसक व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, पुढील तीन दिवसांत निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी तसेच या मोहिमेचा दैनंदिन अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२४ तासांत ठोस उपाययोजना न झाल्यास संतप्त नागरिकांसह महापालिका मुख्यालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यश साने यांनी दिला आहे.


















