- कर्नाटकला पळून जाण्यापूर्वी पती पोलिसांच्या ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा | २३ सप्टेंबर २०२६ :- कुसगाव बुद्रुक येथील कारके वस्तीमध्ये पत्नीवर दगड आणि विटांनी हल्ला करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर कर्नाटकच्या दिशेने रेल्वेने निघण्याच्या तयारीत असलेल्या पतीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
दगडू रामू वाघमारे (वय ४५) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी काळी दगडू वाघमारे (वय अंदाजे ४० ते ४५) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी साडेचारच्या दरम्यान कारके वस्ती येथे हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीतून आरोपी रेल्वेने कर्नाटककडे जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण माने आणि महिला सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी कारवाई केली. पुढील तपास भूषण माने करीत आहेत.


















