न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागातील फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी तसेच सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन (सीएचडीसी) प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नढे यांच्या तक्रारीनुसार, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे काम दर्शन डिजिटल या संस्थेला एका वर्षासाठी २० लाख ८३ हजार रुपयांत देण्यात आले होते. संबंधित मुदत संपल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी ३ मार्च २०२१ रोजी नव्याने निविदा काढण्याचे आणि मुदतवाढ न देण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, नवीन निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने जुन्याच संस्थेकडून काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप नढे यांनी केला आहे. सन २०२१ मध्ये फोटो व्हिजन आणि दर्शन डिजिटल यांनी सुरक्षा ठेवीसंदर्भात असमर्थता दर्शविल्यानंतरही निविदा प्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
याच प्रकरणातील सुमारे २२ कोटी रुपयांच्या खर्चाशी संबंधित निविदेबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभागाने २ सप्टेंबर २०२४ रोजी २० आक्षेप नोंदवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
निविदा प्रक्रियेतील निर्णय, कामाचा कालावधी, खर्च आणि लेखापरीक्षणातील आक्षेप यांची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नढे यांनी केली आहे.

















