न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार आणि सहकारी संस्थांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात स्वतंत्र सहकार न्यायालय सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा संविधान विधी सेवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमात बोलताना अॅड. झोळ यांनी गेल्या तीन दशकांतील शहराच्या न्यायव्यवस्थेतील बदलांचा आढावा घेतला. शहरात न्यायालयांची संख्या वाढली असून जिल्हा न्यायालय, वरिष्ठ विभागाचे न्यायालय आणि अन्य न्यायालयीन सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, सहकारी संस्थांशी संबंधित प्रकरणांसाठी नागरिकांना अद्याप पुणे येथे जावे लागत असल्याने वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र सहकार न्यायालय उपलब्ध झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा थेट फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी तरुण वकिलांनी व्यावसायिक प्रगतीसोबतच सचोटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाला महत्त्व देण्याचे आवाहन केले.


















