- समितीकडून आंद्रा पाणी योजनेसाठी २२० कोटींची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या पाणीगरजेला लक्षात घेऊन आंद्रा धरणातून अतिरिक्त १०० एमएलडी पाणी आणण्याच्या योजनेला गती मिळाली आहे. जॅकवेल आणि बंदिस्त जलवाहिनीच्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने २२० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.मंजुरीनंतर या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या शहराला पवना धरणातून सुमारे ५२० एमएलडी, तर आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळते. आंद्रा योजनेतील जॅकवेलचे काम पूर्ण होईपर्यंत निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून तात्पुरत्या स्वरूपात दररोज ९५ एमएलडी अशुद्ध पाणी उचलले जाते. चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी शहराला पुरवले जाते.
आंद्रा धरणातून थेट पाणी उचलण्यासाठी जलसंपदा विभागाने जॅकवेलसाठी ९५ गुंठे जागा मंजूर केली आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहराच्या दीर्घकालीन पाणीगरजेसाठी भामा-आसखेड धरणातून आणखी १६७ एमएलडी पाणी आणण्याचे कामही मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.


















