- समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा..
- १० ते १५ दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- रमाई आवास योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचू नये म्हणून ‘आम्हाला ही योजना नको’ अशा आशयाच्या कथित खोट्या सह्या घेऊन प्रस्ताव मागे पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सुनावणी झाली.
यावेळी समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत योजना रखडण्याबाबत जाब विचारला. बैठकीत उपस्थित बहुजन समाज पक्षाच्या (BSP) पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून पालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीचे इतिवृत्त दोन दिवसांत देण्यात येणार असून त्याआधारे पदाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, असे लोंढे यांनी सांगितले. तसेच १० ते १५ दिवसांत खरे लाभार्थी व पालकांची बैठक घेऊन कागदपत्रांची पडताळणी करावी आणि पात्र लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
या निर्णयामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


















