- युवा सेना शहर संघटक निलेश हाके यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी सुरक्षारक्षकांचे प्रलंबित वेतन आणि नियमानुसार देय असलेला दिवाळी बोनस सणापूर्वी अदा करावा, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निम्हण यांना निवेदन देण्यात आले.
महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये, रुग्णालयांमध्ये आणि आस्थापनांमध्ये कंत्राटी सुरक्षारक्षक प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, दिवाळी सण जवळ आला असतानाही त्यांचे वेतन आणि बोनस रखडल्याने युवा सेनेने नाराजी व्यक्त केली.
प्रलंबित वेतन तातडीने द्यावे, पात्र कर्मचाऱ्यांना बोनस अदा करावा आणि टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
युवा सेना शहर संघटक निलेश हाके यांनी आक्रमक भूमिका घेत, “सुरक्षारक्षकांची दिवाळी गोड झाली नाही, तर अधिकारी-ठेकेदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही,” असा इशारा दिला. दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


















