- कचरा संकलन, स्वच्छता आणि एसटीपीच्या प्रश्नांवर नगरसेवक राहुल कलाटे यांचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑक्टोबर २०२६) :- नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू करूनही आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप भाजपा नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसराचा समावेश असून, तीन लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागत असून, अपुऱ्या वाहनांमुळे संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. परिणामी सोसायट्यांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
घंटागाड्या, स्वच्छता कर्मचारी, जेटिंग मशीन आणि इतर यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी, तसेच ठेकेदारांच्या कामावर देखरेख ठेवून निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, परिसरातील अपुऱ्या एसटीपी प्रकल्पांची क्षमता वाढवून सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करावी, अशी मागणीही कलाटे यांनी केली आहे.


















