- मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.
औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे या दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार २२ सप्टेंबर २०२६ पासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती.
या पाचही मतदारसंघांतील निवडणुकांची मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडली. त्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केले.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांतील आचारसंहिता संपुष्टात आल्याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी विक्रम निकम यांनी यासंदर्भातील पत्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. त्यामुळे संबंधित पाच मतदारसंघांतील आचारसंहितेचे निर्बंध आता संपुष्टात आले आहेत.


















