- गणेश विसर्जनाबाबत काढला सकारात्मक तोडगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- गणेश उत्सव हा गणेश भक्तांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. परंतु, कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विसर्जन करण्यासाठी काही निर्बंध आणले आहेत. परंतु, महानगरपालिकेने काही पर्यायी व्यवस्था करने आवश्यक होते. परंतु, तसे न झाल्यामुळे दीड दिवसाचा गणपती विसर्जन करायला खुप मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांना अडचणी आल्या. पिं. चिं. शहरातील गणेश विसर्जन नदीचे घाट बंद होते. विसर्जन हौद नव्हते, फिरत्या विसर्जन हौदची सोय केली नव्हती. कोठेच विसर्जनाची पर्यायी व्यवस्था नव्हती, म्हणून मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, उपशहराध्यक्ष, दत्ता देवतरसे, विभाग अध्यक्ष सुशांत साळवी, शहर संघटक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांशी गणपती विसर्जनाबाबत सविस्तर चर्चा झाली व त्यावर त्वरित निर्णय झाले. महानगरपालिकेचे कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असल्याकारणाने मागणीनुसार सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्था, राजकीय तसेच सामाजिक संघटना यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात मुख्य चौकात विसर्जन हौद तसेच फिरते विसर्जन कुंड याची व्यवस्था करून देऊ, असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहे.
यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सार्वजनिक मंडळे व संघटनांनी पुढाकार घेवून पालिकेशी संपर्क साधावा व गणरायाचे कार्य सिद्धिस न्यावे, असे आवाहन मनसेचे उपशहराध्यक्ष राजू सावळे यांनी केले आहे.















