चंदिगड – डेराप्रमुख गुरमीत राम रहीमची खास राहिलेल्या हनीप्रीतची डायरी डी-कोड करण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यश मिळवले असून डेरा सच्चा सौदाशी निगडित देश-विदेशातील कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा यात झाला आहे. पोलिसांनी गतवर्षी सप्टेंबरमध्ये हनीप्रीतजवळून ही डायरी हस्तगत केली होती. ईडीला ११ महिन्यांचा काळ ती डी-कोड करण्यात लागला. साध्वींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गुरमीत राम रहीम २० वर्षे कैदेची शिक्षा भोगत आहे. पंचकुलामध्ये दंगे घडवण्याच्या आरोपावरून हनीप्रीतही अंबाला तुरुंगात बंद आहे.
हनीप्रीतजवळील डायरीत लिहिलेले शब्द पोलिसांना समजत नव्हते. ती यानंतर ईडीला सोपवण्यात आली. यात ‘वायानाड केरला लैंड’, ‘मशीन वेट कम करने वाली’, ‘हिमाचल की लँड न्यू’, ‘दार्जिलिंग लँड’, ‘न्यू लँड ऑरेंज काउंटी की दुसरी तरफ’, ‘मनी ट्रान्सफर रिसॉर्ट टुडे’, ‘हिमाचल की लँड रिसॉर्ट के नाम करना’, ‘टीम्स फॉर वी ७ इन १२’, ‘२५ दे दो गर्ग को’ आणि ‘संजू लँड गुडगाव’ यासारखे कोडवर्ड वापरण्यात आले होते. यानंतर काही हिशेबही लिहिलेला होता. यादरम्यान जवळजवळ २० कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टीचा खुलासा झाला आहे. एजन्सीज डेराप्रमुखाच्या लॅपटॉपचीही तपासणी करत आहे.
ईडीच्या चौकशीत समोर आलेले आहे की, मागच्या काही वर्षांत राजस्थानात ३० एकर, हरियाणात १०५ एकर, उत्तरप्रदेशात १५ एकर आणि उत्तराखंडमध्ये १९ एकर प्रॉपर्टी घेण्यात आली. याशिवाय अमेरिकेसहित अनेक जागांवर बनलेल्या आश्रमांची जमीनही खरेदी करण्यात आली. ईडी आता चौकशी करत आहे की, विदेशात घेण्यात आलेल्या प्रॉपर्टीसाठी पैसा कुठून आला.
हनीप्रीतच्या डायरी डी-कोडने उलगडणार डेरा सच्चा सौदाचे आर्थिक रहस्य.














