- भंगार व्यवसायिकांना भंगार खरेदी – विक्रीची नोंद ठेवणे केले बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. त्यात जेसीबी, ट्रक अशा अवजड वाहनचोरीचेही प्रकार समोर येत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. अशी चोरीची तसेच चोरीचा इतर माल शहरातील भंगार व्यावसायिकांकडून खरेदी होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे भंगार खरेदी – विक्रीची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
औद्योगिक परिसरात चो-यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. कंपन्यांतील लोखंड, मशिन तसेच त्यांचे साहित्य आदी चोरी केले जाते. यात काही सराईत टोळ्यांचा सहभाग असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
या टोळ्यांकडून असा चोरीचा माल खरेदी करणारे काही भंगारमाफिया शहरात आहेत. अशा निर्णयामुळे या माफियांचे धाबे दणाणले आहे. भंगार व्यावसायिकांनी त्यांच्याकडील व्यवहार नोंद ठेवली पाहिजे. भंगारमाल खरेदी करताना त्याचा फोटो काढून ठेवावा. जेणेकरून चोरीच्या मालाची खरेदी थांबून चोरीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.