- दापोडी व पिंपळे गुरवमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- शहरात सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा मारुन ६७ हजार ८४६ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. दापोडी व पिंपळे गुरव येथे झालेल्या कारवाईत १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही या कामगिरी केली.
शहरातील अवैधधंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षापथकाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे कल्याण मटका सुरु असल्याची माहिती पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. दापोडी रेल्वेस्टेशन गेटजवळ, मोकळ्या जागेत बाभळीच्या झाडाखाली काही लोक पैशावर अवैधरित्या मटका जुगार सुरू होता. मटका चालक मालक कृष्णा मोरे व इतर ११ आरोपी कल्याण मटका खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ३५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून केला.
पिंपळे गुरव येथे मटका सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पिंपळे गुरवच्या शिवरामनगर येथील के. पी. व्हिडीओ गेम पार्लर येथे मटका सुरू होता. संदीप गोयल, नितीन गोयल (दोघे रा. पिंपळे गुरव) व भगत नावाची महिला तसेच इतर चार जण कल्याण मटका जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ३१ हजार ९६६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.