न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२९ डिसें.) :- नेहरूनगर मधील आर. एम. जाधवर चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प खर्चात एका गरीब महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मेंदूतील गाठ काढण्यात आली आहे. अरुणा महापदी (वय ४२, रा.वाडीबीड, ता खेड, जि रत्नागिरी) असे या रुग्ण महिलेचे नाव आहे.
या बाबतीत जाधवर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ प्रकाश जाधवर म्हणाले की, एका महिन्यापूर्वी बेशुद्ध अवस्थेत रुग्ण आला होता. सर्व चाचण्या केल्यावर एम. आर. आय. मध्ये दोन मेंदूच्यामध्ये गाठ असल्याचे दिसून आले. गरीब घरातील रुग्णास पैशासाठी न आडवता तातडीने रुग्णावर शस्त्रक्रिया केली. आज रुग्ण धोक्याच्या बाहेर आहे.
मेंदूतज्ञ डॉ. भगीरथ मोरे म्हणाले की, एमआयआर केल्यावर रुग्णाच्या मेंदूच्या डाव्या बाजूला नसेला ६ x ४ सेमीची गाठ पसरलेली दिसून आली. यामुळे मेंदूवर ताण आला होता. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे साडेतीन तास वेळ लागला. मायक्रोस्कोपीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया केली. ४ दिवसांनी रुग्ण शुद्धीवर आली. आज रुग्ण चालतो बोलतो. सुमारे ५ लाख खर्च असलेली ही शस्त्रक्रिया अत्यल्प खर्चात केल्यामुळे रुग्णाचे दिर भार्गव महापदी यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. सुभाष मदने, डॉ वृषाली जोशी, भागेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.