न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३१ डिसें.) :- रावेत बीआरटीएस या मार्गावरील जगताप डेअरी साई चौक येथील श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलचा काळेवाडीमार्गे औंधकडे जाणारा पुलाचा एकेरी मार्ग सोमवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे, प्राधिकरणचे सीईओ सतिशकुमार खडके, प्राधिकरणचे अधिक्षक अनिल सुर्यवंशी, महानगरपालिकेचे शहर अभियंता ओंभासे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात विठ्ठल उर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांनी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा एकेरी मार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडीकडून औंध मार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनाना शिवार चौकातून वळून परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते. त्यामुळे शिवार चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे रोजच वाहतूक कोंडी होत होती. हा उड्डाणपूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.















