- पालिका देणार मालकी हक्काच्या सदनिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- महापालिका सेवेत २५ वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या किंवा निधन झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३९२ पैकी ७६ कर्मचारी पात्र ठरले आहेत. याबाबत १४ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत महापालिकेत २५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मालकी तत्त्वावर सदनिका उपलब्ध करून दिली जाते. या सदनिकांचे चटई क्षेत्र २६९ चौरस फूट असेल.
महापालिका प्रशासनाकडून २२ ऑक्टोबर २००८ ते ३१ ऑगस्ट २०१८ याकालावधीत २५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. त्यात ३९२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यातील २९१ कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतलेले असून, त्यांचे स्वतःचे घर आहे. तसेच, २५ कर्मचाऱ्यांची सेवा २५ वर्षे पूर्ण झालेली नाही, अशा ३१६ कर्मचाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले.
















