- भोंदुगिरी करून महिलेची आर्थिक फसवणूक; दिघीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- महिलेला एक वर्षापासून बाहेरची करणी झाल्याचा संशय होता. त्यांच्या बहिणीचा मुलाने आरोपीला सांगितले. त्याने त्याच्या अन्य दोन मित्रांना फिर्यादी यांच्या घरी आणले. त्या दोघांनी फिर्यादी यांच्या घरात भूत आहे व फिर्यादी पौर्णिमेच्या आत मरून जातील, असे सांगितले. फिर्यादी यांना हाॅलमध्ये बसवून त्यांच्या आजूबाजूला हळद व कुंकू टाकले. आरोपीने फिर्यादी यांना पट्ट्याने पाठीवर हातावर मारून जखमी केले.
आरोपीने फिर्यादी यांच्या शरीरावरुन लिंबू उतरवले व अगरबत्ती पेटवून त्यांच्या जिभेला आणि ओठांना चटके दिले. फिर्यादी यांना अगरबत्तीचा धूर ओढण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ३५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही वारंवार फिर्यादी यांच्याकडे फोन वरून पैशांची मागणी केली.
फिर्यादी यांना पुन्हा चाकूचा धाक दाखवून एक हजार रुपये जबरदस्तीने नेले. तसेच हातात चाकू धरून फिर्यादी व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ जून ते १ जुलै या कालावधीत चौधरी पार्क, दिघी येथे घडला.
पीडित महिलेने सोमवारी (दि. ५) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव गणपत भोईर (वय १९, रा. नेवासा फाटा, अहमदनगर), अॅशली जोसेफ, तुषार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
















