- पोलिसाला मारहाण; नोकरी घालविण्याची धमकी; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- विनामास्क फिरणाऱ्या आरोपींवर कारवाई करत असताना आरोपींनी फिर्यादी पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ केली. तसेच, धक्काबुक्की करून पावती पुस्तक हिसकावून घेतले. एवढेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादी यांना चक्क नोकरी घालवण्याचीही धमकी दिली.
आरोपींना चौकशीसाठी पोलीस चौकीत घेऊन जात असताना आरोपी पळून गेला. तर, दुसऱ्या आरोपीने लाकडी दांडके फिर्यादी यांच्या कपाळावर मारले. पिंपरीतील मोरवाडी येथे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. नंतर पळून गेलेल्या दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रामदास सोपान लुकर (वय ६५, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) व सतीश पवार (वय ४०, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.