- पोलिसांकडून ताबडतोब गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक..
- सफाई सेवक महिलांनी केला पोलिस अधिका-यांचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई ठेकेदार सफाई सेवकांचे आर्थिक शोषण करतात. याबाबत सफाई सेवक महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने ताबडतोब कायदेशीर कारवाई केली. संबंधित महिलांना त्यांचे पासबुक व एटीएम अठरा वर्षांपासून ठेकेदार देत नव्हते. पोलिसांनी मात्र काही तासातच ते मिळवून दिले.
लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत गुरुवारी (दि. ५ ऑगस्ट) सफाई सेवक महिलांनी व आरपीआयच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय वाहतुक कष्टकरी कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख आणि प्रदेश कार्याध्यक्ष सचिन वाघमारे यांनी पोलिस अधिका-यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.
सर्व सामान्यांचे शोषण करणा-या प्रवृत्तीविरोधात आपण पुढे येऊन पोलिस प्रशासनाशी संपर्क करावा. पोलिस नक्कीच त्याचे दखल घेतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई ठेकेदार सफाई सेवकांचे एटीएम आणि बँक पासबुक मागील अठरा वर्षांपासून देत नव्हते. याबाबतची तक्रार येताच पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तातडीने आदेश दिले. ताबडतोब गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. हे एकजूटीने पुढे येणा-या महिला भगिनींचे यश आहे असे पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ म्हणाले.
पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यावेळी म्हणाले की, आपला हक्क व विकासासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. समाजातील जातीयता संपुष्ठात येण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा ही शिकवण आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन केले असेही मंचक इप्पर म्हणाले.