- पाचशे दावे तडजोडीसाठी असताना केवळ १७ जणांची उपस्थिती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- मालमत्ताकर थकबाकी थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने लोकन्यायालय आयोजित केले होते. त्यासाठी विभागीय १६ करसंकलन कार्यालयात सुनावणी झाली. पाचशे दावे तडजोडीसाठी ठेवले होते. मात्र केवळ १७ जणांनी उपस्थित राहून ५५ लाख रुपये थकबाकी भरली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. १) लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. महापालिका अधिनियमानुसार थकबाकी रकमेवर दरमहा दोन टक्के दराने शास्ती अर्थात दंड आकारला जातो. मात्र, काही थकबाकीदार मालमत्ताधारक वर्षानुवर्षे कराचा भरणा करत नसल्याने थकबाकीच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयासमोर ठेवली आहेत. अशा पाचशे थकबाकीदार मालमत्ताधारकाना महापालिकेने नोटीस आणि स्मरणपत्रे पाठविली होती.
विलंब शुल्काच्या रकमेत सवलतही जाहीर केली. मात्र ही सवलत अवैध बांधकामाच्या शास्तीसाठी नव्हती. निगडी विभागीय करसंकलन कार्यालय कक्षेतील प्रकरणांची सुनावणी महापालिका दिवाणी फौजदारी न्यायालय, आकुडी येथे आणि उर्वरित १५ विभागीय कर संकलन कार्यालय कक्षेतील प्रकरणांची सुनावणी संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये झाली.
मालमत्ताकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने पाचशे थकबाकीदारांना नोटीस दिल्या होत्या. त्यातील १७ जणांनी उपस्थित राहून ५५ लाख रुपये भरले आहेत. मात्र, नोटीस न दिलेल्या चाळीस जणांनीही या योजनेच्या लाभ घेऊन २६ लाख रुपये भरले. अशा एकूण ५७ थकबाकीदारांकडून ८१ लाख रुपयांची थकबाकी जमा आहे.
– स्मिता झगडे (उपायुक्त करसंकलन विभाग)…