- नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिम उभारणे गरजेचे..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- महापालिकेच्या वतीने ओपन जिम उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ओपन जिम साहित्याचे दर करार करून खरेदी करायची आहे. याबाबतचे केलेले स्पेसिफिकेशन हे कालबाह्य झाले आहे. त्यामुळे त्याचा फारसा लाभ नागरिकांना होणार नाही, असा आरोप पिंपरी- चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिम उभारणे आवश्यक असून, ती निविदा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे शुक्रवारी (दि. ६) तक्रार केली आहे.
मिसाळ म्हणाले की, प्रचलित अत्याधुनिक स्पेसिफिकेशनचे आर्टिफिशिअल वूड या प्रकारचे ओपन जिम साहित्य सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे, नागपूर, चंद्रपूर व इतर विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. आर्टिफिशिअल वूड प्रकारच्या साहित्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट असून दीर्घ कालावधीसाठी उपयोगात येईल, याबाबत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील क्रीडा संचालनालय पुणे यांनी ओपन जिम साहित्याच्या स्पेसिफिकेशनला तांत्रिकदृष्ट्या मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार या स्पेसिफिकेशननुसार क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य खरेदी प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेतील स्पेसिफिकेशनमध्ये काळानुरूप बदल करण्यात यावा; जेणेकरून ओपन जिम साहित्य हे दर्जेदार खरेदी करणे सोयीचे होईल. तसेच, भविष्यातील देखभाल खर्चातसुद्धा बचत होऊ शकेल. त्यासाठी स्पेसिफिकेशन कालबाह्य झालेली ही निविदा रद्द करावी, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.