- पालिकेच्या सबंधित विभागांसाठी आयुक्तांकडून परिपत्रक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- महापालिकेच्या विविध भांडवली, महसुली, आस्थापना किंवा आगाऊ बिले पूर्तता करण्यासाठी लेखा विभागात सादर केली जातात. संबंधित विभागातील आहरण व वितरण अधिकारी यांनी लेखा विभागाकडून जारी केलेले आदेश, परिपत्रके, सरकारी निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने परिपूर्ण बिले लेखा विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. काही विभागांकडून लेखा विभागात बिले सादर करताना त्रुटी राहतात. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
आयुक्तांनी वेळोवेळी जारी केलेल्या वित्तीय अधिकार प्रदान आदेशानुसार सक्षम अधिकाऱ्याची बिलावर स्वाक्षरी असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. स्थायी समिती सभा मान्य ठराव क्रमांक, दिनांक व मंजूर मर्यादेत खर्च रक्कम याबाबत खात्री करावी. विकासकामांची बिले लेखा विभागात सादर करण्यापूर्वी त्यांची तांत्रिक छाननी करावी. तसेच अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत खात्री करावी.
एफडीआर, डीमांड ड्राफ्ट, पीएसडी, बीजी यांच्या वैधतेबाबत विभागाची खात्री झाल्यावरच बिले लेखा विभागात सादर करावीत. त्या व्यतिरिक्त बिले लेखा विभागास सादर करण्यापूर्वी ती परिपूर्ण व नियमानुसार असल्याची खात्री करावी. त्यानंतरच संबंधित विभागप्रमुखांनी किंवा व वितरण अधिकारी यांनी लेखा विभागास बिले सादर करावीत. संबंधित विभागांनी ही बिले मंजूर करताना योग्य असल्याची खात्री करुनच मंजूर करावीत. अन्यथा भविष्यात लेखा परीक्षण आक्षेप उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील असे परिपत्रकात म्हटले आहे.