- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून निलंबनाचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- आरोपीची पत्नी ही चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या संपर्कात असल्याचा संशय संबंधित आरोपीला होता. त्यामुळे त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी संबंधित आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून देण्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसाने आरोपीला त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून दिला.
संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशी दरम्यान त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता, पोलिसाने सीडीआर काढून दिल्याचे आरोपीने सांगितले.
या प्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण नावजी आढारी यांना निलंबित केले आहे.
















