- मुदतीत स्वहिस्सा न भरणा-या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतून रद्द होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या से.क्र. १७ व १९ चिखली येथील जागेवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासांठी घरकुल योजना राबविणेत येत असून यासाठी निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरणेसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देणेस आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली. ही अंतिम मुदतवाढ असून या मुदतीमध्ये स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
स्थायी समिती सभेने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली होती.
या योजनेमध्ये दि. २३/०८/२०११ रोजी झालेल्या संगणकीय सोडतीमधील प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या प्रवर्गानिहाय ४५६ लाभार्थींना घरकुल योजनेमध्ये स्वहिस्सा रक्कम भरणेकामी मान्यता देण्यात आलेली आहे. संबंधित लाभार्थींनी प्रथम स्वहिस्सा र. रु. ५०,०००/ व उर्वरीत स्वहिस्सा र.रु. ३,२६,०००/- असे एकूण र.रु.३,७६,०००/- भरणेकामी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामधील प्रथम स्वहिस्सा रक्कम भरणा करणा-या लाभार्थींना उर्वरीत स्वहिस्सा भरणेकामी व ज्या लाभार्थींनी प्रथम व उर्वरीत स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही अशा लाभार्थींना स्वहिस्सा रक्कम भरणा करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर निवड झालेल्या या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या https:// www.pcmcindia.gov.in/ marathi/ index.php या संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चिंचवड येथे पाहण्यास उपलब्ध आहे.
















