- मुदतीत न हटविल्यास गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिग्जचे पेव फुटले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा होत असून सुसज्ज रस्ते बकाल होत आहेत. शहरातील अशा अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत एकाच वेळी कारवाई केली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी अनधिकृत जाहिरातींचे फलक काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात सुमारे २ हजार होर्डिग्ज आहेत; त्यापैकी केवळ ५०० होर्डिग्ज हे अधिकृत आहेत. उर्वरित होर्डिग्ज हे अनधिकृत, परवाना नूतनीकरण तसेच, शुल्क न भरलेले आहेत. शहरात विकसित झालेल्या भागात तसेच, प्रशस्त रस्ते तयार झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे होर्डिज लावले जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेची परवनागी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक लावले आहेत. त्याची नोंद नसल्याने पालिकेच्या महसुलात घट होत आहे. महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी अनधिकृत जाहिरात फलकावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी सात दिवसांच्या आत अनधिकृत जाहिरात फलक स्वखर्चाने काढावेत.
हे जाहिरात फलक काढून न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या वतीने हे जाहिरात फलक काढून टाकण्यात येतील. तसेच त्याचा खर्च संबंधिताकडून वसूल केला जाईल. ज्या व्यापाऱ्याचे, संस्थेचे अथवा बांधकाम व्यावसायीकाची त्यावर जाहिरात लावलेली असेल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.