- इंगोले पाटील कंट्रक्शनच्या त्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- खोदकाम सुरक्षिततेबाबत काळजी न घेतल्याने गॅस लाइन लीकेज होऊन आग लागली. यामध्ये एक दांपत्य जखमी झाले तर त्यांची दुचाकी जळून खाक झाली. या प्रकरणी जेसीबी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ जुलै रोजी पिंपळे गुरव येथे घडली होती.
इंगोले पाटील कंट्रक्शन कंपनीचा १७ एव्ही जिसीपी (एमएच १७ ए व्ही ८६९१) वरील चालक आकाश तिम्मा दाङ्गुळे (वय ३५, पत्ता माहित नाही) असे आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलिस ठाण्यातील हवालदार दिनेश श्रीकृष्ण देशमुख यांनी शनिवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महेंद्र बावनलीकर (वय ५२) आणि त्यांची पत्नी स्मिता बावनलीकर (वय ५०, दोघेही रा. पाषाण, पुणे) अशी जखमी झालेल्या दुचाकीवरील दांपत्याचे नाव आहे. ३१ जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव कार्यालय जवळील सार्वजनिक रस्त्यावर इंगोले पाटील कंस्ट्रक्शन कंपनीकडून खोदाईचे काम सुरू होते. याठिकाणी खोदकाम करताना जेसीपी चालकाने सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे गॅस पाइपलाइन लीकेज होऊन आग लागली. यावेळी त्या ठिकाणाहून जात असलेल्या बावनलीकर हे दांपत्य आगीत जखमी झाले. तसेच त्यांची दुचाकी जळूनही खाक झाली.