- एनएबीएचद्वारे आरोग्य केंद्रातील सुधारणांसाठी शंभर कोटींची गुंतवणूक?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये सोशल इम्पॅक्ट सुधारणा करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत बॉण्डच्या माध्यमातून गुंतवणूकदारांमार्फत आगाऊ गुंतवणूक होणार आहे. त्यासाठी महापालिकेने संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) दिल्ली कार्यालयासोबत सामंजस्य करार केला आहे. आरोग्य सेवा केंद्राच्या बळकटीकरण व सुधारणांसाठी शंभर कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. एनएबीएच मान्यतेद्वारे सर्व ४१ आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
सोशल इम्पॅक्ट बॉण्ड ही नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा कार्यतंत्र पध्दत आहे. यामध्ये या प्रकल्पासाठी निवडले गेलेले गुंतवणूकदार आरोग्य सेवा केंद्रे सुधारण्यासाठी आगाऊ गुंतवणूक अर्थसंकल्पीय करणार आहेत या गुंतवणुकीची परतफेड महापालिकेने निक्षित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यावर केली जाईल. मात्र, महापालिकेने याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करणे आवश्यक आहे. उद्दिष्टे साध्य न झाल्यास गंतवणकदाराला पैसे न मिळण्याची जोखीम उचलावी लागणार आहे. या प्रकल्प अंमलबजावणीसाठी आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वैद्यकीय विभागप्रमख व वायसीएम रुग्णालय अधिष्ठाता यांची समिती स्थापन केली आहे. या समितीस निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत महापालिकेने दिल्ली कार्यालयासोबत सामंजस्य करार केला आहे. यूएनडीपी ही संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था आहे. आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण हे यांचे महत्वाचे कार्यक्षेत्र आहे. सामंजस्य करारातील तरतुदीनुसार यूएनडीपी महापालिकेला आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या योजना आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक साहाय्य करणार आहे. या योजनेचे टप्पे निर्धारित करण्यासाठी यूएनडीपी अनुदान देणार आहे. या प्रकल्पांतर्गत मूल्यमापन करणे, योजना आखणे, जोखीम घेऊ शकणारे गुंतवणूकदार शोधण्यात मदत करणे. प्रकल्प अंमलबजावणी करण्याकरिता यूएनडीपीने निविदा प्रक्रियेद्वारे पैलडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियक्ती केली आहे.
अंमलबजावणी समितीचे कार्य….
- गुंतवणूकदारांसोबत करण्याचा करार, कामगिरीचे मूल्यमापन करणे.
- अटी – शर्ती यांची रचना निश्चित करणे.
- गुंतवणूकदार यूएनडीपीने नियुक्त केलेल्या संस्थाबरोबर त्रिपक्षीय करार करणे.
- उद्दिष्टे साध्य झाल्यावर गुंतवणूकदारांना प्रीमियम देणे.
- आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कर्मचारी भरती करणे.
- द्वितीय स्तरावरील रुग्णालयाच्या कामांची व्याप्ती निश्चित करणे.
एनएबीएच मान्यतेद्वारे सर्व ४१ आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा प्रक्रिया सुरळीत होऊन रुग्णालय कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजाचे परिणामकारक व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. द्वितीय स्तरावरील सात रुग्णालयांत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर लागणा-या सुविधांचा लाभ घेणा-या रुग्णांची संख्या येणार आहे. रुग्णालयातील साहित्य, प्रयोगशाळा इतर साहाय्यभूत यत्रणांद्वारे प्रसूती सेवांमध्ये सुधारणा झाल्यास वायसीए रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. वायसीएम रुग्णालयात इतर विशेष उपचारांची क्षमता वाढविली जाणार आहे. या रुग्णालयात दोन अतिरिक्त शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.