- नातवाच्या उपचारासाठी दारोदारी फिरणाऱ्या आजीबाईंना दिला आधार..
- उपचाराचा भार शिरावर घेत दोन लाखांचा धनादेश काळे कुटुंबियांकडे सुपूर्द..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- वाकडच्या म्हातोबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या व हातात फायली घेऊन पुढाऱ्यांना विनवणी करून, नातवाच्या उपचारासाठी मदत मागणाऱ्या आजीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आश्रू पुसत मदतीचा हात पुढे केला आहे. आजीच्या नातवाच्या रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलत, दोन लाखांचा धनादेश आजीबाई व काळे कुटुंबीयांकडे सुपूर्द केला आहे.
रुक्मिणीबाई काळे असे या आजीचे नाव असून त्यांचा नातू भरत काळे (वय १७ वर्षे) याची जन्मजात एकच किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे त्याची उंची – वजन वाढत नाही. किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय आहे. वडिलांचा पाय मोडल्याने त्यांना किडनी देता येत नाही, आजी किडनी दानाला तयार आहे. मात्र, रक्तगट मॅच होत नसल्याने प्लाझ्मा थेरपी व व इंजेक्शनद्वारे रक्तगट जुळवून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी भलामोठा खर्च लागणार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक, मोलमजुरी करून गुजराण करणारे काळे कुटुंबीय रुग्णालयाचा खर्च कसा भागवणार? आधीच नातवावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला आठवड्यातून चार वेळा डायलिसीस, प्लाझ्मा थेरपी, इंजेक्शन द्यावे लागते. आर्थिक संकटापुढे रुक्मिणीबाई आणि काळे कुटुंबीय हतबल झाले आहे.
नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले, म्हातोबानगरवासीयांनी कायम आमच्या कलाटे कुटुंबियाबर प्रेम केले आहे. आमचे वडील स्व. पांडुरंगभाऊ कलाटे यांनी रंजल्या-गांजलेल्या, दिन-दुबळ्यांना सढळ हाताने मदत करण्याच्या दिलेल्या शिकवणीचा वारसा आम्ही कायम जपत आहोत. म्हातोबा नगर वासीयांच्या सुख-दुःखात, अडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. काळे कुटुंबियांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यांना धीर दिला. शस्त्रक्रियेची प्रक्रिया, अपेक्षित खर्च, शस्त्रक्रियेनंतर औषधांचा खर्च याबाबत रुग्णालयात जाऊन उपचार करणारे संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. भरत काळे या युवकाच्या किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाखांच्या अनामत रक्कमेचा धनादेश काळे कुटुंबियांकडे सुपूर्त केला. पुढील उपचाराच्या सर्व खर्चाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः उचलली आहे.