न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळखळ उडाली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे पेटवून घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे हा तरूण काही कामासाठी आला होता. दरम्यान, त्याने अचानक रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच, लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर जखमी अवस्थेत सुरेश पिंगळे यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या तरुणाने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल असल्याने, पासपोर्ट रिजेक्ट करण्यात आला होता, त्यातून त्याने पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.