- नगरसेविकेच्या त्या तक्रारी मोघम – आयुक्त राजेश पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- नगरसेविका आशा शेंडगे यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात केलेल्या तक्रारीवर स्थळनिहाय पाहणी करून कार्यवाही करण्यात आली आहे. त्यावर मी माझ्या सहीने उत्तरेही दिली आहेत. त्यांच्या इतर काही तक्रारी असतील तर त्यांनी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळ किंवा अध्यक्षांकडे तक्रार करावी, असे महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. २४) स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीसंदर्भात तब्बल १७ तक्रारी केल्या असून, त्यावर कार्यवाही न करता ते संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. ते खोटे बोलत आहेत, असा आरोप जामिनावर सुटलेल्या भाजपच्या कासारवाडीच्या नगरसेविका शेंडगे यांनी गुरूवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत केला. त्यासंदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, नगरसेविका शेंडगे यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या मोघम तसेच, विशिष्ट भागांतील आहेत. तक्रारीनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या त्या वेळी कार्यवाही करण्यात आली आहे. तसे उत्तर त्यांना दिले गेले आहे. तो सर्व पत्रव्यवहार माझ्या सहीनिशी रेकॉर्डवर आहे. त्यांच्या इतर काही किंवा वेगळ्या तक्रारी असल्यास त्यांनी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळ किंवा अध्यक्षांकडे करावे. तसेच, माझ्याकडेही तक्रारी करू शकतात. चर्चा करू शकतात. त्यांचे तक्रारींचे निरसन केले जाईल, असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.