- महापौर उषा ढोरे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या किवळे येथील मोकळ्या जागेत चेंबूरच्या धर्तीवर शिवसृष्टी विकसित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शुक्रवारी केली. शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पिंपरी – चिंचवड शहराच्या महापौर ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी गडकरी यांची पुण्यात घेतली. महापौर म्हणाल्या, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई- बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर रस्ता बनविला आहे. या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. लोकसंख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ता अपुरा पडून वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करावे.
नामदेव ढाके म्हणाले, किवळे येथे जुना बंगळूर महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग एकत्रितपणे येतो. संबंधित जागा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे ठिकाण पिंपरी – चिंचवडचे प्रवेशद्वारही आहे. याठिकाणी मोकळी असणारी जागा विकसित करणे शक्य आहे. येथे मुंबईतील चेंबूरच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवसृष्टी विकसित करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी खर्चही केला जाईल. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. यासाठी केंद्र सरकारने केवळ ना हरकत दाखला द्यावा. उर्वरित कामे पालिका मार्गी लावणार आहे.


















