- तब्बल ४६४ कोटींच्या वादग्रस्त विषयाला सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा संजीवनी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या ४६४ कोटी खर्चाच्या वादग्रस्त विषयाचे सत्ताधारी भाजपने पुनरुज्जीवन केले आहे. नव्याने प्रस्ताव तयार करून ४ प्रस्ताव प्रशासकीय पॅकेज ऐवजी दोनच पॅकेज तयार करावेत. मान्यतेसाठी ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत ठेवावा, अशी उपसूचना सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केली. त्यासाठी सल्लागारामार्फत तिसऱ्यांदा मसुदा तयार करण्यात येणार आहे.
स्थायी समितीने ११ सप्टेंबर २०१८ रोजी शहरातील मंडई, रस्ते आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी आरएफपी तयार करण्यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यानुसार, १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स मार्फत तयार केलेला मसुदा १९ जानेवारी २०२१ रोजी सादर केला.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समक्ष सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना सल्लागार संस्थेस देण्यात आल्या. सुधारित आरएफपी मसुदा सादर करण्यात आला. सत्ताधारी भाजपने पाच महिने हा प्रस्ताव तहकूब ठेवला. २० सप्टेंबर रोजीच्या सभेत विषयाची २ पॅकेजमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.


















