- सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं भावी नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगल?…
- तीनच्या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजगी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक पाच महिन्यावर येऊन ठेपली आहे. निवडणूक विभागाकडून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. आधी एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते भावी नगरसेवक होण्याची स्वप्न पाहत होते. अचानक राज्याच्या मंत्रीमंडळाकडून वार्ड पद्धतीत बदल करून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यातच केवळ इलेक्टिव्ह मेरिट पाहूनच राष्ट्रवादीत सत्तेच्या मॅजिक फिगरसाठी इतर पक्षातील नगरसेवकांचे इनकमिंग करणार असल्याची घोषणा खुद्द अजित पवारांनीच केल्यामुळे राष्ट्रवादीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे अवसानच गळाल्याचे चित्र पक्षात पहायला मिळतेय.
”अजितदादा आम्ही राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून निष्ठावंत म्हणून काम करीत आलो आहोत. अगदी महापालिकेत सलग १५ वर्षे सत्ता असतानाही आम्हाला कधी संधी मिळाली नाही. पाच वर्षे विरोधक म्हणूनही आम्ही अवहेलना सहन केली. तरीही आम्ही कधी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकचा प्रभाग तीनचा करून काय साध्य होणार? आपण केवळ इलेक्टिव्ह मेरिट पाहून सत्तेच्या मॅजिक फिगरसाठी इतर पक्षातील नगरसेवकांचे इनकमिंग पक्षात करणार असाल, तर आम्ही अजून किती दिवस सतरंज्या उचलायच्या”, असा सवाल अनेक कार्यकर्ते न्यूज पीसीएमसीला खासगीत प्रतिक्रिया देताना उपस्थित करू लागले आहेत.
आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आणि इलेक्टिव्ह मेरिटच मारक ठरणार असल्याचे भाकीत राजकीय जाणकार वर्तवू लागले आहेत.