- वाकडमध्ये अज्ञाताकडून प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात फलकबाजी..
- फलकबाजीचा जनक कोण? नागरिकांमध्ये उत्सुकता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ पाहत आहे, तसतशी रंगत वाढताना दिसत आहे. स्मार्ट सिटी वाकड परिसरात उच्चभ्रू नागरिकांची वस्ती आहे. मात्र, असे असतानादेखील प्रभागात प्रशस्त आणि मोठे रस्ते नाहीत. अशी तेथील नागरिकांची नेहमीचीच ओरड असायची. याला उघडपणे विरोध मात्र होत नसायचा.
आता या बाबीला अप्रत्यक्ष का होईना हटके पद्धतीने विरोध होऊ लागलाय. चक्क रस्त्यावर अप्रत्यक्षपणे ”आता नागरिकांची एकच मागणी … रस्ता व नगरसेवक नवीन हवा… ‘होय.. मी रस्ता बोलतोय’… अशा आशयाची फलकबाजी करून प्रस्थापितांच्या विरोधात रान पेटविण्याचा प्रकार घडलाय.
वाकड परिसरात हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. स्मार्ट प्रभाग अशीही याची ओळख. त्यामुळे नोकरदार वर्गाने इथे मोठ्या संख्येने सदनिका खरेदी करून आपलं बस्तान बसविलं. बिल्डरने सदनिका खरेदीवेळी या ठिकाणी ४५ मीटरच्या रस्त्याचे नियोजन असल्याचे सदनिकाधारकांना भासविले. मात्र, प्रत्यक्षात स्थानिकांनी रस्त्यासाठीच्या जागा अडवून सोसायटीधारकांची कोंडी केली.
मुळात, ज्या ठिकाणी ४५ मीटर रस्त्याचे नियोजन आहे; तिथे पालिका प्रशासनाने आडमुठी भूमिका घेत जागेच्या उपलब्धतेनुसार ३०, २४, १८ मीटरचे रस्ते विकसित केले. त्यामुळे प्रभागात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. साडेचार वर्षात साधी पाणी समस्यादेखील येथील स्थानिक नगरसेवकांना सोडता आली नाही. विरोध करावा तर मागे स्थानिकांचा भुंगा. अशा कचाट्यात इथला नागरिक भरडला. साडेचार वर्षात प्रभागातील स्थानिक नगरसेवक फिरकलाच नाही; आता निवडणूक सहा महिन्यांवर आली असता स्थानिक नगरसेवक नागरिकांची विचारपूस करताना दिसत आहेत, असे मत प्रभागातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.














