- बांधकाम ठेकेदार व मजूरांचा पिंपरीत मेळावा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२१) :- पुणे, पिंपरी चिंचवड शहरात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातील बांधकाम मजूर बांधकाम क्षेत्रात काम करतात. हेच मजूर पुढे काहीसा अनुभव येताच मजूर पुरवणे, प्लास्टर, लोखंडी सळ्या बांधणे, पेंटिंग, फिटिंग, प्लंबर आदी प्रकारचे ठेकेदारी तत्वावरील कामे करतात. मात्र, बिल्डर आणि विकसक अधिक नफा कमावण्यासाठी या छोट्या बांधकाम ठेकेदारांचे शोषण करतात. त्यांच्याकडून जास्त काम करून घेऊन त्यांना कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही; काम पूर्ण केल्यानंतरदेखील बिलं थकविले जातात. काहीवेळा बिलाचे पैसेही बुडवितात. कोविड काळात बांधकाम मजूर आणि छोटे ठेकेदार यांना बिले न मिळाल्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले, असे कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले.
कष्टकरी कामगार पंचायत व बांधकाम ठेकेदार पंचायत वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त बांधकाम ठेकेदार व मजूर यांचा पिंपरीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. यावेळी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस बांधकाम मजूरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी बांधकाम मजूर आणि ठेकेदारांच्या वतीने कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला.
दरम्यान बांधकाम ठेकेदार पंचायत संघटेनची २५ जणांची कार्यकारणी समिती यावेळी जाहीर करण्यात आली. त्यांना बाबा कांबळे आणि अनिता सावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, बांधकाम ठेकेदार पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष राजू साव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रंजीत शहा, कार्याध्यक्ष मुकेश ठाकूर, उपाध्यक्ष बिनेश्वर यादव आदी उपस्थित होते. चाकण, तळेगाव, वाकड, हिंजवडी, पुनावळे, वारजे माळवाडी, चंदननगर, येरवडा, विमाननगर, खराडी, हडपसर परिसरातून ठेकेदार आणि बांधकाम मजुरांनी हजेरी लावली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
पुणे जिल्हा अध्यक्ष पदी राजू साव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रंजीत शहा, कार्याध्यक्षपदी मुकेश ठाकूर, उपाध्यक्षपदी बानेश्वर यादव, कार्यकारणी सदस्यपदी मानसिंग राजपूत, सुखदेव पंडित, अशोक पास्वान, लक्ष्मण वरवटे, मोहम्मद अंवर, ईरप्पा नाइके, जगदीश विश्वकर्मा, अभिमन्यु कुमार सिंग, मुकेशकुमार राय, संतोष साव, केदार साव, राजीव साव, मुकेश राम, अभय सिंग, तानाजी मालु, जैसवाल, फुलचंद निर्मळकर.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता सावळे यांनी, सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे तर, आभार रणजीत सहा यांनी मानले.