- पालिकेचा उद्यान विभाग अनं स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष..
- वृक्षप्रेमींची लोखंडी जाळ्या हटविण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- चिंचवडेनगर परिसरातील पंचवटी ते वाल्हेकरवाडी रस्त्यावरील गुरुमैय्या शाळेच्या आवारात पालिकेने झाडांभोवती लावलेल्या वृक्ष संरक्षक जाळ्या (ट्रि गार्ड) या वृक्षांना इजा पोहोचवीत आहेत. झाडांची वाढ होऊन देखील बऱ्याच दिवसांपासून या वृक्षांची संरक्षक लोखंडी जाळी काढलेली नाही. त्यामुळे या झाडांना इजा पोहचत आहे. पालिकेचा उद्यान विभाग आणि प्रभागातील स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष या झाडांच्या मुळावर येऊ पाहत आहे.
पालिकेचा वृक्षारोपनाचा कार्यक्रम हा केवळ फार्स आणि दिखावा ठरू पाहत आहे. लावलेल्या वृक्षाची, रोपट्याची निगा राखता यावी, त्यांचे नागरिकांपासून, जनावरांपासून किवां इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून, वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) खरेदी केली जाते. मात्र, एकदा का या जाळ्या लावून झाल्या की, आपले काम संपले. या अविर्भावात पालिकेचे उद्यान विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
कालांतराने वृक्षाभोवती लावलेल्या या जाळ्या त्यांची वाढ खुंटवण्याचे काम करतात. प्रसंगी या लोखंडी जाळ्या त्या वृक्षांना इजाही पोहचवत असतात. त्यामुळे पालिकेने त्वरित या वाढ झालेल्या झाडांभोवतीच्या लोखंडी जाळ्या हटवून झाडांना इजामुक्त करावे, अशी मागणी चिंचवडेनगर येथील वृक्षप्रेमी करू लागले आहेत.


















