- गरबा, दांडिया, मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर सरकारचे निर्बंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, असे राज्य सरकारेन म्हटले आहे.
परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे.
पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्षिशत करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
















